Prediger 4
Die Tränen der Unterdrückten
1मी पुन्हा एकदा जे सर्व जाचजुलूम भूतलावर करण्यात येतात ते पाहिले. पीडीलेल्यांच्या अश्रुकडे पाहा. तेथे त्यांचे समाधान करणारा कोणी नाही. त्याजवर जाचजुलूम करणाऱ्यांच्या हातात बळ आहे. पण पीडीलेल्यांचे समाधान करणारा कोणी नाही. 2म्हणून मी मरण पावलेल्यांचे अभिनंदन करतो. जे आज जिवंत आहेत, व अद्याप जगत आहेत त्यांचे नव्हे, 3जो अजून उत्पन्न झाला नाही, जे वाईट कृत्ये भूतलावर करतात ते त्याने पाहिलेच नाही, तो त्या दोघांपेक्षा बरा आहे असे मी समजतो.
4नंतर मी पाहिले की, सर्व कष्ट व कारागिरीचे प्रत्येक काम असे आहे की, त्यामुळे त्याचा शेजारी त्याचा हेवा करतो. हेही व्यर्थ आहे व हे वायफळ प्रयत्न करण्यासारखे आहे. 5मूर्ख हाताची घडी घालून स्वस्थ बसतो आणि काही काम करत नाही, त्याचा देह त्याचे अन्न आहे. 6परंतु भरलेल्या दोन मुठीपेक्षा व वायफळ प्रयत्नापेक्षा स्वस्थपणे कार्य करून मूठभर लाभ मिळविणे हे चांगले आहे.
7मग मी पुन्हा निरर्थकतेबद्दल विचार केला, भूतलावरील व्यर्थ गोष्टी पाहिल्या. 8तेथे अशाप्रकारचा कोणी मनुष्य आहे, तो एकटाच असून त्यास दुसरा कोणी नाही. त्यास मुलगा किंवा भाऊ नाही. परंतु तेथे त्याच्या कष्टाला अंत नाही. मिळकतीच्या धनाने त्याच्या नेत्राचे समाधान होत नाही. तो स्वतःशीच विचार करून म्हणतो, मी इतके कष्ट कोणासाठी करीत आहे? आणि माझ्या जिवाचे सुख हिरावून घेत आहे? हेही व्यर्थ आहे, वाईट कष्टमय आहे. 9एकापेक्षा काम करणारे दोन माणसे बरी आहेत. कारण त्यांच्या एकत्र श्रमाने ते चांगले वेतन मिळवू शकतात.
10जर एखादा पडला तर त्याचा दुसरा मित्र त्यास उचलतो. पण जो एकटाच असून पडतो त्यास उचलण्यास कोणी नसते, त्याच्यामागे दुःख येते. 11आणि जर दोघे एकत्र झोपले तर त्यांना ऊब येऊ शकते. परंतु एकट्याला ऊब कशी काय येऊ शकेल? 12जो मनुष्य एकटा आहे त्यास कोणी भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल. तीन पदरी दोरी सहसा तुटत नाही.
Besser ein armer und weiser Jüngling
13गरीब पण शहाणा असलेला तरुण नेता हा वृध्द आणि मूर्ख राजापेक्षा चांगला असतो. तो वृध्द राजा त्यास दिलेल्या इशाऱ्यांकडे लक्ष देत नाही. 14कदाचित तो तरुण राजा जन्माने गरीब असेल किंवा तो तुरुंगातून राज्य करायला बाहेर आला असेल. 15तथापि, जे सर्व जिवंत भूतलावर चालतात त्यांना मी पाहिले, जो दुसरा तरुण त्याच्या जागी राजा म्हणून उभा राहिला ते त्यास शरण गेले.
16त्या सर्व लोकांचा म्हणजे ज्या सर्वांवर तो अधिकारी झाला त्यांचा, काही अंत नव्हता. तरी जे लोक पुढे होणार आहेत ते त्याच्याविषयी आनंद करणार नाहीत. खचित ही परीस्थिती व्यर्थ आहे आणि हे वायफळ प्रयत्न करण्यासारखे आहे.