Matthäus 2

Der Besuch der Weisen

1हेरोद राजाच्या दिवसात यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नगरात येशूचा जन्म झाल्यानंतर, पूर्वेकडील देशातून ज्ञानी लोक यरूशलेम शहरात येऊन विचारपूस करू लागले की, 2“यहूद्यांचा राजा जन्मला आहे तो कोठे आहे? आम्ही पूर्वेला त्याचा तारा पाहीला आणि त्यास नमन करावयास आलो आहोत.” 3जेव्हा हेरोद राजाने हे ऐकले, तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरूशलेम शहर घाबरून गेले; 4हेरोद राजाने सर्व मुख्य याजकांना व नियमशास्त्राचे शिक्षक यांना एकत्र जमवून त्यांना विचारले की, ख्रिस्ताचा जन्म कोठे होणार आहे?

5ते त्यास म्हणाले, “यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नगरात, कारण संदेष्ट्यांच्याद्वारे असे लिहिलेले आहे की; 6‘हे बेथलेहेमा, यहूदाच्या प्रांता, तू यहूदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही कारण तुझ्यातून असा सरदार निघेल जो मा‍झ्या इस्राएल लोकांचा सांभाळ करील.’” 7मग हेरोद राजाने ज्ञानी लोकांस गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा नक्की कधी दिसला याची वेळ विचारून घेतली.

8त्याने त्यांना बेथलेहेमास पाठवताना म्हटले, “तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने शोध करा व तुम्हास शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मी ही येऊन त्यास नमन करीन.” 9राजाचे हे सांगणे ऐकून ते त्यांच्या वाटेने निघाले. जो तारा त्यांनी पूर्वेस पाहीला होता त्याने बेथलेहेम नगरापर्यंत त्यांचे मार्गदर्शन केले आणि ज्ञानी लोक बालकापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्यापुढे चालला. 10तो तारा पाहून ज्ञानी लोकांस अतिशय आनंद झाला.

11नंतर ते त्या घरात गेले आणि ते बालक आपली आई मरीया हिच्याजवळ असलेले त्यांनी पाहीले व खाली वाकून त्यांनी त्यास नमन केले. त्यांनी आपल्या द्रव्यांच्या थैल्या उघडून सोने, ऊद व गंधरस ही दाने अर्पण केली. 12देवाने त्यांना स्वप्नात हेरोदाकडे परत जाऊ नका, अशी सूचना दिल्यामुळे ते दुसर्‍या मार्गाने आपल्या देशास निघून गेले.

Josef bringt das Kind nach Ägypten

13ते गेल्यावर, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “ऊठ, बालक व त्याची आई यांना घेऊन मिसर देशात पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा कारण बालकाचा घात करण्यासाठी हेरोद राजा त्याचा शोध करणार आहे.” 14त्या रात्री तो उठला आणि बालक व त्याची आई यांना घेऊन रातोरात मिसर देशात निघून गेला. 15तो हेरोदाच्या मरणापर्यंत तेथे राहिला. “मी माझ्या पुत्राला मिसर देशातून बोलावले आहे.” असे जे प्रभूने संदेष्ट्याच्याद्वारे सांगितले ते पूर्ण झाले.

Die Kinder von Betlehem werden getötet

16तेव्हा ज्ञानी लोकांनी आपणाला फसवले हे पाहून हेरोद राजा अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने ज्ञानी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेहेमात व आसपासच्या सर्व प्रदेशांत जे दोन वर्षांचे व त्याहून कमी वयाचे पुरूष बालके होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जिवे मारले. 17यिर्मया संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले होते, ते त्यासमयी पूर्ण झाले. ते असेः 18“रामा येथे रडणे व मोठा आकांत ह्यांचा शब्द ऐकण्यात आला, राहेल आपल्या मुलांकरिता रडत आहे, आणि ती नाहीत म्हणून ती सांत्वन पावेना.”

Aus Ägypten zurück nach Nazaret

19पुढे हेरोद राजा पावल्यावर, पाहा प्रभूचा दूत मिसर देशात योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, 20“उठ, बालकास व त्याच्या आईस घेऊन इस्राएल देशास जा, कारण बालकाचा जीव घ्यावयास जे पाहत होते ते मरून गेले आहेत.” 21तेव्हा तो उठला आणि बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशात आला.

22परंतु अर्खेलाव हा आपला पिता हेरोद याच्या जागी यहूदीया प्रांतात राज्य करीत आहे असे ऐकून तो तेथे जाण्यास घाबरला, आणि स्वप्नात देवाने सूचना केल्यानंतर तो गालील प्रांतास निघून गेला, 23व नासरेथ नावाच्या गावी जाऊन राहिला अशासाठी की, “त्याला नासोरी म्हणतील” हे जे संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे.

Kopiert!
Aa