Johannes 14
Viele Wohnungen im Haus des Vaters
1“तुमचे अंतःकरण घाबरू देऊ नका; देवावर विश्वास ठेवा, माझ्यावरही विश्वास ठेवा. 2माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हास तसे सांगितले असते; मी तुमच्यासाठी जागा तयार करावयास जातो 3आणि, मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्याजवळ घेईन; यासाठी जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.
4मी जातो तिकडचा मार्ग तुम्हास माहीत आहे.”
Der Weg, die Wahrheit und das Leben
5थोमा त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हास माहीत नाही; मग मार्ग आम्हास कसा माहीत असणार?” 6येशूने त्यास म्हटले, “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही. 7मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आतापासून पुढे तुम्ही त्यास ओळखता आणि तुम्ही त्यास पाहिलेही आहे.” 8फिलिप्प, त्यास म्हणाला, “प्रभूजी, आम्हास पिता दाखवा, म्हणजे आम्हास तेवढे पुरे आहे.” 9येशूने त्यास म्हटलेः “फिलिप्पा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे; तर ‘आम्हास पिता दाखवा’ असे तू कसे म्हणतोस?
10मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे, असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हास सांगतो, त्या मी आपल्या मनाच्या सांगत नाही; माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कामे करतो. 11मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे यावर तुम्ही विश्वास ठेवा; नाही तर माझ्या कृत्यांमुळे तरी माझ्यावर विश्वास ठेवा. 12मी तुम्हास खरे खरे सांगतो, मी जी कामे करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा अधिक मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो.
13पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. 14तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन.
Die Verheißung des Beistands
15माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. 16मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हास दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. अशासाठी की, त्याने तुम्हाबरोबर सर्वकाळ रहावे. 17तो सत्याचा आत्मा आहे, जग त्यास ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्यास पाहत नाही अथवा त्यास ओळखीत नाही; तुम्ही त्यास ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो आणि तो तुम्हामध्ये वस्ती करील.
18मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही; मी तुम्हाकडे येईन. 19आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही. पण तुम्ही मला पाहाल; मी जिवंत आहे, म्हणून तुम्हीही जिवंत रहाल. 20त्यादिवशी तुम्हास समजेल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे.
21ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत आणि जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील; मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्यास प्रकट होईन.” 22यहूदा (इस्कार्योत नव्हे) त्यास म्हणाला, “प्रभूजी, असे काय झाले की, आपण स्वतः आम्हास प्रकट व्हाल आणि जगाला प्रकट होणार नाही?” 23येशूने त्यास उत्तर दिले, “ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील; माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन, त्याच्याबरोबर वस्ती करून राहू.
24जो माझ्यावर प्रीती करीत नाही तो माझी वचने पाळीत नाही आणि तुम्ही जे वचन ऐकता ते माझे नाही तर ज्याने मला पाठवले त्या पित्याचे आहे. 25मी तुमच्याबरोबर राहत असतांना या गोष्टी तुम्हास सांगितल्या आहेत. 26तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हास सर्वकाही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हास सांगितल्या त्या सर्वाची तुम्हास आठवण करून देईल.
Meinen Frieden lasse ich euch
27मी तुम्हास शांती देऊन ठेवितो; मी आपली शांती तुम्हास देतो जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही; तुमचे अंतःकरण अस्वस्थ किंवा भयभीत होऊ नये, 28‘मी जातो आणि तुम्हाकडे परत येईन.’ असे जे मी तुम्हास सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हास आनंद वाटला असता; कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे. 29ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून ते होण्याअगोदर, आता मी तुम्हास सांगितले आहे, 30यापुढे, मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा शासक येतो; तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही.
31परंतु मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे मी करतो, हे जगाने ओळखावे म्हणून असे होते. उठा, आपण येथून जाऊ.”