Mateo 7

No juzguéis

1इतरांचे दोष काढू नका म्हणजे तुमचे दोष काढण्यात येणार नाहीत. 2कारण ज्या प्रकारे तुम्ही इतरांचे दोष काढता त्याच न्यायाने तुमचेही दोष काढले जातील आणि ज्या मापाने तुम्ही मोजून देता त्याच मापाने तुम्हास परत मोजून देण्यात येईल. 3तू आपल्या डोळ्यातील मुसळ लक्षात न घेता आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस?

4अथवा ‘तुझ्या डोळ्यांतले कुसळ मला काढू दे’ असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पाहा, तुझ्या स्वतःच्या डोळ्यात तर मुसळ आहे. 5अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यांतले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळयांतले कुसळ काढण्यासाठी तुला स्पष्टपणे पाहता येईल. 6जे पवित्र आहे ते कुत्र्यांना टाकू नका आणि आपले मोती डुकरांपुढे टाकू नका; टाकाल तर कदाचित ती त्यांना पायदळी तुडवतील व नंतर ती उलटून येवून तुम्हासही फाडतील.

Pedid, buscad, llamad

7मागा म्हणजे तुम्हास देण्यात येईल. शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. 8कारण प्रत्येकजण जो मागतो त्यास मिळते, जो शोधतो त्यास सापडते आणि जो ठोठावतो, त्याच्यासाठी दरवाजा उघडले जाते. 9तुमच्यामध्ये कोण मनुष्य असा आहे, जो आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्यास दगड देईल?

10किंवा त्याने मासा मागितला असता, त्याऐवजी त्यास साप देईल? 11वाईट असूनही जर तुम्हास आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देण्याचे कळते तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडे जे मागतात, त्यांच्या गरजा तो किती चांगल्या प्रकारे भागवील? 12यासाठी ज्या गोष्टी लोकांनी तुमच्यासाठी कराव्यात असे तुम्हास वाटते त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी करा, कारण नियमशास्त्राच्या व संदेष्टयांच्या शिकवणीचे सार हेच आहे.

La puerta estrecha

13अरुंद दरवाजाने आत जा कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रूंद व मार्ग प्रशस्त आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ लोक आहेत. 14पण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग अडचणीचा आहे आणि ज्यांस तो सापडतो ते फारच थोडके आहेत.

Por sus frutos los conoceréis

15खोट्या संदेष्ट्यांविषयी सावध असा. ते मेंढरांच्या वेषात घेऊन तुमच्याकडे येतात. पण खरे सांगायचे तर ते क्रूर लांडग्यांसारखे आहेत. 16त्यांच्या फळांवरुन तुम्ही त्यांस ओळखाल. काटेरी झाडाला द्राक्षे लागतात काय? किंवा रिंगणीच्या झाडाला अंजिरे येताच काय? 17त्याचप्रमाणे चांगले झाड चांगले फळ देते, परंतु वाईट झाड वाईट फळ देते.

18चांगल्या झाडाला वाईट फळे येणार नाहीत आणि वाईट झाडाला चांगली फळे येणार नाहीत. 19जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडण्यात येते व अग्नीत टाकले जाते. 20यास्तव त्यांना तुम्ही त्यांच्या फळांवरून ओळखाल.

21मला प्रभू, प्रभू म्हणणारा प्रत्येकजण स्वर्गाच्या राज्यात जाईलच असे नाही; तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागतो त्याचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल. 22त्यादिवशी मला अनेक जण म्हणतील, हे प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले, तुझ्या नावाने भूते काढली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले नाहीत काय? 23तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मी तुम्हास ओळखत नाही. अहो दुराचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून चालते व्हा.

Los dos constructores

24जो कोणी माझ्या सांगण्याप्रमाणे आचारण करतो तो शहाण्या मनुष्यासारखा आहे, अशा शहाण्या मनुष्याने आपले घर खडकावर बांधले. 25मग जोराचा पाऊस झाला आणि पूर आला. जोराचा वारा आला. वादळात घर सापडले, पण ते पडले नाही कारण त्याचा पाया खडकावर बांधला होता. 26जो कोणी माझीही वचने ऐकून त्याप्रमाणे आचरण करीत नाही तो कोणाएका मूर्ख मनुष्यासारखा आहे, त्याने आपले घर वाळूवर बांधले.

27मग जोराचा पाऊस आला आणि पूर आला. जोराचा वारा सुटला. वादळवाऱ्यात ते घर सापडले आणि कोसळून पडले.”

Las multitudes se admiran

28येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की, लोकसमुदाय त्याच्या शिक्षणाने थक्क झाला. 29कारण येशू त्यांना त्यांच्या नियमशास्त्र शिक्षकांप्रमाणे नव्हे, तर अधिकारवाणीने शिकवत होता.

¡Copiado!
Aa