Levítico 14

La purificación de la enfermedad de la piel

1परमेश्वर मोशेला म्हणाला, 2महारोग बरा झालेल्या लोकांस शुद्ध करून घेण्याविषयीचे नियम असे: याजकाने महारोग्याला तपासावे. 3याजकाने छावणीच्या बाहेर जाऊन त्या महारोग्याला तपासावे व त्याचा महारोग बरा झाला आहे किंवा नाही ते पाहावे.

4तो बरा झाला असल्यास याजकाने त्यास शुद्ध होण्यासाठी दोन जिवंत शुद्ध पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब झाडाची फांदी घेऊन येण्यास सांगावे. 5मग वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात त्यातला एक पक्षी मारण्याची याजकाने आज्ञा द्यावी. 6याजकाने जिवंत पक्षी, गंधसरुचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब ही सामग्री घेऊन जिवंत पक्षासह वाहत्या पाण्यावर मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात बुडवावी; 7आणि ते रक्त महारोगापासून शुद्ध ठरवावयाच्या मनुष्यावर सात वेळा शिंपडावे; मग तो शुद्ध झाला आहे असे सांगावे व त्यानंतर याजकाने माळरानात जाऊन त्या जिवंत पक्ष्यास सोडून द्यावे.

8मग शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याने आपले कपडे धुवावे, आपले मुंडन करून घ्यावे आणि पाण्याने स्नान करावे म्हणजे तो शुद्ध ठरेल; त्यानंतर त्याने छावणीत यावे; तरी त्याने सात दिवस आपल्या तंबूबाहेर रहावे; 9सातव्या दिवशी त्याने आपले डोके, दाढी, भुवया व अंगावरील एकंदर सर्व केस मुंडवावे; आपले कपडे धुवावे व पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध होईल. 10आठव्या दिवशी त्या मनुष्याने दोन निर्दोष कोकरे, एक वर्षाची निर्दोष मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेला तीन दशांश एफा मैदा, व एक लोगभर तेल ही सामग्री याजकाकडे आणावी; 11आणि शुद्ध ठरविणाऱ्या याजकाने शुद्ध ठरवणाऱ्या मनुष्यास, त्या अर्पण करावयाच्या सामग्रीसह परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी उभे करावे.

12मग याजकाने दोषार्पणासाठी एक कोकरु व एक लोगभर तेल अर्पावे; ते ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे; 13मग याजकाने पवित्रस्थानात जेथे पापबली व होमबली ह्यांचा वध करतात तेथे ते कोकरु वधावे कारण पापबली प्रमाणेच दोषार्पणावरही याजकाचा हक्क आहे; हे अर्पण परमपवित्र आहे. 14मग याजकाने दोषार्पणाचे काही रक्त घेऊन शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे.

15याजकाने लोगभर तेलातले थोडेस तेल आपल्या डाव्या तळहातावर ओतावे; 16मग याजकाने आपल्या उजव्या हाताचे बोट आपल्या डाव्या तळहातावरील तेलात बुडवून त्यातले काही परमेश्वरासमोर सात वेळा बोटाने शिंपडावे. 17त्याच्या तळहातावर जे तेल उरेल त्यातले काही घेऊन याजकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीवरील, उजव्या हाताच्या अंगठ्यावरील व उजव्या पायाच्या अंगठ्यावरील दोषार्पणाच्या रक्तावर लवावे.

18तळहातावर उरलेले तेल याजकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या डोक्याला लावावे आणि अशा प्रकारे त्या मनुष्यासाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे. 19मग याजकाने पापबली अर्पावा आणि अशुद्ध झालेल्या मनुष्याच्या शुद्धतेसाठी प्रायश्चित करावे; त्यानंतर त्याने होमबलीचा वध करावा; 20मग याजकाने होमबली व अन्नबली वेदीवर अर्पून त्या मनुष्यासाठी प्रायश्चित करावे म्हणजे तो शुद्ध ठरेल.

21परंतु तो मनुष्य गरीब असून एवढे आणण्याची त्यास ऐपत नसेल तर त्याने आपल्या प्रायश्चितासाठी ओवाळणीचे एक कोकरु दोषार्पण म्हणून आणावे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेला, एक दशांश एफा मैदा आणि एक लोगभर तेल आणावे; 22आणि ऐपतीप्रमाणे दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले त्याने आणावी; त्यातील एक पापबली व एक होमबली व्हावा. 23आठव्या दिवशी आपल्या शुद्धीकरणासाठी त्यानेही सामग्री घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर जावे.

24मग याजकाने ते दोषार्पणाचे कोकरू व लोगभर तेल घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे. 25त्यानंतर याजकाने दोषार्पणाच्या कोकराचा वध करावा आणि त्याने त्या कोकऱ्याचे काही रक्त घेऊन शुद्ध ठरवावयाच्या व्यक्तीच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्यांला लावावे. 26याजकाने त्या तेलातले काही आपल्या डाव्या तळहातावर ओतावे; 27मग याजकाने उजव्या हाताच्या बोटाने त्यातील काही तेल परमेश्वरासमोर सात वेळा शिंपडावे.

28मग याजकाने आपल्या तळहातावरील काही तेल घेऊन शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीवर, उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्यांवर, दोषार्पणाचे रक्त लावलेल्या जागेवर लावावे. 29याजकाने तळहातावर उरलेले तेल शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या डोक्याला परमेश्वरासमोर त्या मनुष्यासाठी प्रायश्चित म्हणून लावावे. 30मग त्याच्या ऐपतीप्रमाणे त्यास मिळालेले होले किंवा पारव्याची पिल्ले ह्यांच्यापैकी एकाचे त्याने अर्पण करावे.

31त्यांच्यापैकी एकाचे पापार्पण करावे व दुसऱ्याचे होमार्पण करावे; पक्ष्यांची ही अर्पणे त्याने अन्नार्पणासहीत करावी; ह्याप्रकारे याजकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याकरिता परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे; मग तो मनुष्य शुद्ध होईल. 32अंगावरील महारोगाचा चट्टा बरा झालेल्या मनुष्यास आपल्या शुद्धीकरणासाठी साहित्य मिळण्याची ऐपत नसलेल्या मनुष्याच्या शुद्धीकरणासंबंधी हे नियम आहेत.

El moho en una casa

33परमेश्वर मोशे व अहरोन ह्याना असेही म्हणाला, 34कनान देश मी तुम्हास वतन म्हणून देत आहे. तुमचे लोक त्यामध्ये जाऊन पोहोंचतील त्यावेळी तुमच्या वतनाच्या देशातील एखाद्या घराला मी महारोगाचा चट्टा पाडला, 35तर त्या घराच्या मालकाने याजकाला जाऊन सांगावे की, माझ्या घरात चट्ट्यासारखे काहीतरी दिसते.

36मग याजकाने लोकांस घर रिकामे करण्याची आज्ञा द्यावी; लोकांनीही घरातील सर्व वस्तू याजक, चट्टा तपासण्यासाठी घरात जाण्याच्या अगोदर बाहेर काढाव्या नाहीतर घरातील सर्व वस्तू अशुद्ध समजाव्या. मग याजकाने रिकाम्या घरात जाऊन ते तपासावे. 37तो चट्टा त्याने तपासावा, आणि घराच्या भिंतीवर हिरवट किंवा तांबूस रंगाची छिद्रे किंवा खळगे असतील व ती भिंतीच्या पृष्ठभागाच्या आत गेली असतील. 38तर मग याजकाने घराबाहेर दारापाशी यावे व ते घर सात दिवस बंद करून ठेवावे.

39मग सातव्या दिवशी याजकाने पुन्हा जाऊन ते घर तपासावे आणि तो चट्टा घराच्या भिंतीवर पसरला असल्यास, 40चट्टा असलेले दगड काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध जागी टाकून देण्याची याजकाने लोकांस आज्ञा द्यावी. 41मग याजकाने घर लोकांकडून आतून खरडवून घ्यावे आणि खरडवून काढलेला चुना नगराबाहेर अशुद्ध ठिकाणी लोकांनी टाकून द्यावा.

42त्या मनुष्याने त्या दगडांच्या ऐवजी भिंतीत दुसरे दगड बसवावे आणि त्या घराला नव्या चुन्याचा गिलावा करावा. 43जुने दगड काढून नवीन दगड बसविल्यावर व घर खरडवून नवीन गिलावा केल्यावर जर तो चट्टा घरात पुन्हा उद्भवला. 44तर याजकाने आत जाऊन तो तपासावा; घरात तो चट्टा पसरला असल्यास तो घरात चरत जाणारा महारोगाचा चट्टा होय; ते घर अशुद्ध आहे.

45मग त्या मनुष्याने ते घर खणून पाडावे; त्याचे दगड, लाकूड व सगळा चुना त्याने तेथून काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध ठिकाणी फेकून द्यावा. 46आणि घर बंद असताना त्यामध्ये कोणी शिरला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे; 47त्या घरात कोणी काही खाल्ले किंवा कोणी त्या घरात निजला तर त्याने आपले कपडे धुवावे.

La purificación de la casa

48घराला नवीन दगड बसविल्यावर व नवीन गिलावा केल्यावर याजकाने आत जाऊन ते घर तपासावे आणि घरात चट्टा परत उद्भवला नसेल तर त्या घरातला चट्टा गेल्यामुळे त्याने ते शुद्ध ठरवावे. 49त्या घराच्या शुद्धीकरणासाठी दोन पक्षी, गंधसरुचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब ही त्याने आणावी; 50त्याने एक पक्षी वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात मारावा; 51मग त्याने गंधसरुचे लाकूड, एजोब, किरमिजी रंगाचे कापड व जिवंत पक्षी घेऊन त्या मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात व वाहत्या पाण्यात बुडवून त्या घरावर सात वेळा शिंपडावे.

52त्या पक्ष्याचे रक्त, वाहते पाणी, तो जिवंत पक्षी, गंधसरूचे लाकूड, एजोब, आणि किरमिजी रंगाचे कापड ह्याप्रकारे याजकाने ते घर शुद्ध करावे. 53मग त्याने तो जिवंत पक्षी नगराबाहेर जाऊन माळरानात सोडून द्यावा; ह्याप्रकारे त्याने घरासाठी प्रायश्चित केले म्हणजे ते शुद्ध होईल. 54सर्व प्रकारचे महारोगाचे चट्टे, चाई, 55कपड्यावरील किंवा घराचा महारोग, 56सूज, खवंद, तकतकीत डाग या सर्वासंबधीचे हे नियम आहेत; 57हे केव्हा शुद्ध व केव्हा अशुद्ध हे ठरविण्याविषयी शिकवतात; हे महारोगासंबंधीचे नियम आहेत.

¡Copiado!
Aa